Type Here to Get Search Results !

धांदरफळ बु. येथे 'स्वदेश कला उत्सवा' ने ग्रामविकासाचा जागर; विविध सामाजिक उपक्रमांनी सोहळ्याची सांगता.

 

संगमनेर खुर्द:



ग्रामीण भागातील कलागुणांना वाव मिळावा आणि सामाजिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी, या उद्देशाने धांदरफळ बु.येथे आयोजित 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' व 'स्वदेश कला उत्सव २०२६' उत्साहात पार पडला. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाची सांगता मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाली.


या उत्सवाचे उद्घाटन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, धांदरफळ बु. गावाने ग्रामविकासाची वेगळी दिशा दर्शविली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकोपयोगी उपक्रम राबवून या गावाने प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली आहे. श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानच्या विकासासोबतच बाळासाहेब देशमाने आणि ग्रामपंचायतीने ग्रामविकासाचा जो आदर्श ठेवला आहे, तो कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. 


उत्सवादरम्यान राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, संत गाडगे महाराज आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांची जयंती साजरी करण्यात आली. केवळ मनोरंजन न करता, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण आणि शेतकरी पुत्रांच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या 'नवरदेव' या चित्रपटाचे प्रदर्शन करून जनजागृती करण्यात आली. स्वदेश महिला मंचाच्या वतीने 'उत्सव स्त्री शक्तीचा' अंतर्गत 'लय भारी संगमनेरी होम मिनिस्टर' हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. यामध्ये महिलांसाठी पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा करंडा, ओव्हन आणि गॅस शेगडी यांसारखी भरघोस बक्षिसे देण्यात आली. गप्पा, उखाणे आणि खेळांच्या माध्यमातून महिलांना विरंगुळा व विचारांचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.


सुशिक्षित बेरोजगार आणि बचत गटांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. बँकांमार्फत कर्ज वितरण आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले, ज्यामुळे तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेवर आधारित स्वामीराज भिसे आणि रुचिका खोत यांचा 'वारी आडवाटांच्या विठोबाची कीर्तावणी' हा नाट्यप्रयोग सादर झाला. या प्रयोगाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गप्पागोष्टी, गाणे, खेळ, नृत्य, उखाणे याशिवाय महिलांसाठी मनोरंजनाचे आणि विचारांचे व्यासपीठ निर्माण करणारा उपक्रम घेऊन विचाराचे तिळगुळ देऊन हळदीकुंकू समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. तसेच गावातील भूमिपुत्रांच्या कलागुणांचा 'स्वदेश कला गौरव सन्मान २०२६' देऊन गौरव करण्यात आला. उद्धव चंद्रभान गोर्डे यांना कृषी, दुग्ध व्यवसाय व आदर्श कुटुंब, संपत वाकचौरे यांना पारंपारिक लाकडी कला व बाळासाहेब देशमुख यांना ६० वर्षांपासून पारंपारिक शिवणकला (धोतर शिवणकाम) यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच ग्रामविकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सरपंच उज्वलाताई देशमाने व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवाभावी संस्था यांच्या कार्याला शाबासकी देण्याकरिता मकर संक्रांतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो. 


या सोहळ्यासाठी मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कांचनताई थोरात, पांडुरंग घुले, रामहरी कातोरे , बाळासाहेब देशमुख , अनिल देशमुख, खंडू सातपुते, सतीश खताळ ,अरुण वाकचौरे, डॉ. जयश्रीताई थोरात, लताताई कातोरे ,उज्वला देशमाने, संगीता देशमाने, सुनीता कोडे , सुरभी पवार, गोकुळ राहणे, वंदना राहणे, महिलांसाठी प्रशिक्षण उद्योजक कोमल उगले, सारिका परदेशी, प्रिया म्हस्के, विविध बचत गटातील महिला मंडळ , रामेश्वर देवस्थान अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळ, सदस्य, युवा प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार , ग्रामपंचायत सर्व सदस्य मंडळ, ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक, धांदरफळ पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सर्व संस्थांचे पदाधिकारी, हरिभक्त परायण स्वामीराज भिसे, रुचिका खोत, सर्व पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी तर आभार प्रदर्शन नवनाथ देशमाने यांनी केले.

Post a Comment

0 Comments