*पिंपळगाव माथा येथील आगीत बाधित आदिवासी कुटुंबाला मायेचा आधार; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सहकार्य!*
*मेंगाळ कुटुंबाच्या दुःखात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा सहभाग; जीवनावश्यक साहित्याची मदत!*
*संगमनेर खुर्द (ता. संगमनेर): प्रतिनिधी, संजय गोपाळे*
संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा येथील भरमखास वाडीत राहणाऱ्या आदिवासी कुटुंबातील सावळेराम रामभाऊ मेंगाळ यांच्या घराला महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण संसार जळून खाक झाला. या दुर्घटनेत घरातील अन्नधान्य, कपडे, भांडीकुंडी व अन्य जीवनावश्यक साहित्य जळून नष्ट झाले. त्यामुळे मेंगाळ कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, संगमनेर शाखेच्या वतीने तातडीने मदतीचा हात पुढे करण्यात आला. कुटुंबाला गृहउपयोगी वस्तू, कपडे व इतर आवश्यक साहित्य देऊन मायेचा आधार देण्यात आला. या मदतवाटप कार्यक्रमामुळे मेंगाळ कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे, समन्वयक संजय फुलसुंदर, पिंपळगाव देपा येथील पोलीस पाटील भांगरे तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते मेंगाळ कुटुंबाला संसारोपयोगी साहित्य सुपूर्द करण्यात आले.
प्रसंगी डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा राज्यातील पत्रकार, शालेय विद्यार्थी तसेच दीनदुबळ्या घटकांसाठी वर्षातील बहुतांश दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो. “कोणाच्या सुखात जरी सहभागी होता आले नाही तरी दुःखाच्या प्रसंगी संघ नेहमीच मदतीसाठी धावून जातो,” असे ते म्हणाले. संघाचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश व गोवा या राज्यांतही संघाची सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच पिंपळगाव देपा येथील मेंगाळ कुटुंबाला कायमस्वरूपी घर उभारण्यासाठी संगमनेर व अकोला मतदारसंघातील आमदारांनी विशेष मदत करावी, असे आवाहनही डॉ. आरोटे यांनी यावेळी केले.
या उपक्रमासाठी संगमनेर शहरातील प्रसिद्ध डॉ. कुटे, अभियंता सानप, राजन दादा युवा मंच, अभियंता रजनीकांत कवडे, अभियंता सोमनाथ गोडसे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. स्थानिक ग्रामस्थांनीही पुढाकार घेत कुटुंबाला मानसिक आधार दिला.
या सामाजिक कार्यामुळे पत्रकार संघाने समाजातील वंचित घटकांप्रती आपली संवेदनशीलता आणि बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Post a Comment
0 Comments