Type Here to Get Search Results !

आमचे अण्णा सायण्णा मादास


   


    सायण्णा मादास हे माझे सार्वजनिक जीवनातील मार्गदर्शक आहेत. सायण्णा मादास यांचे वैयक्तीक जीवन म्हणजे संघर्ष आणि संस्कार यांचा अनोखा संगम आहे.

    सायण्णा मादास यांचे पितृछत्र खूप लहानपणीच हरपले. पितृछत्र हरपलेल्या सायण्णा यांना त्यांची आई नरसव्वा आणि मामा नारायणराव झुंजूर यांनी खंबीर आधार दिला. त्यांच्याच छत्रछायेखाली सायण्णांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. सायण्णा हे त्यांच्या शाळेतील हुषार विद्यार्थी होते. सायण्णा मादास हे संगमनेरच्या पद्मशाली समाजातील पहीले मॅट्रिक पास विद्यार्थी आहेत. त्यांनी ठरवले असते तर त्यांना सरकारी अधिकारी सहज होता आले असते. त्या काळात सहकारी विणकर चळवळ जोरात होती, संगमनेर हातमाग विणकर औद्योगिक सहकारी सोसायटी राज्यात शिखरावर होती. या सोसायटीचे जनरल सेक्रेटरी पद सायण्णांनी स्वीकारावे यांसाठी पद्मशाली समाजातील बुजुर्ग मंडळींनी आग्रह धरला, यां बुजूर्गांच्या आग्रहाखातर त्यांना वैयक्तीक हिताकडे दुर्लक्ष करून हे पद स्वीकारणे भाग पडले.हा त्यांचा खूप मोठा त्याग आहे.

        तत्कालीन पद्मशाली समाजात श्रीपत, मादास, कत्तूल अशा तीन फड्या होत्या. या फडीच्या प्रमुखाला फेद्दामन्शी (कारभारी) म्हणत. फेद्दामन्शी हे खूप मानाचे, सन्मानाचे आणि जबाबदारीचे पद होते. समाजाच्या सुखात, दुःखात फेद्दामन्शीची भूमिका खूपच महत्वाची होती. समाजातील सर्व घडामोडी, सोयरीक त्यांच्या संमतीनेच होत.समाजातील भांडण तंटे सोडवतांना ते न्यायमूर्तीची भूमिका बजावत असत. समाज घटकांना वेळप्रसंगी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देखील फेद्दामन्शी पार पाडत असत. पद्मशाली समाजाच्या फेद्दामन्शीपद सायण्णांकडे आले आणि त्यांनी ती जबाबदारी जवळपास सात दशके आजन्म पार पाडली.

त्यामुळेच सायण्णांबद्दल समाजातील आबालवृद्धांना आदर आहे. समाजामध्ये सायण्णा यांचा शब्द अंतिम असे. 

      मामा नारायणराव झुंजूर हे नगरपालिकेत अकाऊंटंट होते. घरी त्यांचा पॉवरलूम आणि हातामागाचा व्यवसाय होता. हा सर्व व्यवसाय सायण्णाच सांभाळीत होते.

      सायण्णांचे व्यक्तीमत्व अतिशय प्रभावी होते. स्वच्छ ,शुभ्र, सफेद, कडक ईस्त्री केलेला नेहरुशर्ट, पायजमा त्यांच्या व्यक्तिमत्वाला खूपच शोभून दिसत असे. 

     सायण्णा यांचे व्यवस्थापन कौशल्य अतिशय चांगले होते ,त्यामुळे त्यांनी सोसायटी, समाज आणि घरचा कारभार कुशलतेने सांभाळला. स्वीकारलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.ते उत्तम संघटक होते. त्यांच्यात उच्च दर्जाचे नेतृत्वगुण होते. त्यांचा अभ्यास चांगला होता. ते संयमी होते, सुसंस्कृत होते या गुणांमुळेच त्यांच्यातील राजकीय नेतृत्व फुलले. ना.बी.जे.खताळ पाटील महाराष्ट्र शासनात मंत्री होते. त्यांनी सायण्णांतील हे गुण हेरले आणि त्यांना जवळ केले. काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष पद दिले. 

      विणकर महामंडळाचे सदस्यपद दिले. संगमनेर शहरातील सर्व राजकीय निर्णय ना.बी.जे.खताळ पाटील यांच्यावतीने सायण्णा मादास हेच घेत असत. शासन, प्रशासन, पुढारी, व्यापारी सगळेच सायण्णा मादास यांचा शब्द झेलत असत पण सायण्णांनी त्याचा कधीही गैरफायदा घेतला नाही. आयुष्यात नयापैशाचा देखील भ्रष्टाचार केला नाही, स्वार्थ साधला नाही.

     सायण्णांनी अनेकांना दारू दुकानांचे परवाने मिळवून दिले पण स्वतः मात्र त्यापासून अलिप्त राहिले. ते संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष झाल्यावर असंख्य गोरगरिबांना त्याचा फायदा करून दिला. शेकडो निराधार महिलांना दरमहा अनुदान मिळवून दिले. अनेकांना रॉकेलच्या रिटेल हातगाडी विक्रीचे परवाने मिळवून दिले. हजारो बेरोजगार तरुणांना राष्ट्रीयकरणकृत बँकेतून सुशिक्षित बेकार योजनेतून कर्ज मिळवून दिले.

      सत्तेच्या दाट सावलीत राहूनही सायण्णा यांच्या डोक्यात कधी सत्ता गेली नाही. ते सुरुवातीला सहकारी विणकर सोसायटीत जनरल मॅनेजर होते. काळाच्या ओघात विणकाम व्यवसाय बुडाला. सोसायटी बंद पडली. त्यांनी उदरनिर्वाहासाठी वयाची सत्तरीपर्यंत खाजगी नोकरी केली. 

     ते आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. बी.जे.खताळ पाटील यांच्यानन्तर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्याकडे आले. त्यांनी काँग्रेस पक्ष केंद्रस्थानी मानला. कोणत्याही गटबाजीला थारा न देता त्यांनी बाळासाहेब थोरात यांना पाठिंबा दिला.

       सायण्णा मादास यांचे जीवन म्हणजे एक खुले पुस्तक आहे, ते मनाने निर्मळ होते, आम्हाला त्यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. पद्मशाली समाज आज संगमनेर शहरात जो प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे त्याचे मोठे श्रेय सायण्णा मादास यांना आहे. 

       नात्याने सायण्णा मादास माझे बंधू होते. आम्ही सारे त्यांना अण्णा या नावाने संबोधत असू. आमचे अण्णा बरोबर नऊ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर २०१६ रोजी इहलोक सोडून गेले. आज त्यांचा नववा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

    शब्दांकन - हिरालाल पगडाल, संगमनेर

Post a Comment

0 Comments